Saturday , August 29 2026
Breaking News

शिक्षक की ‘ऑल-इन-वन’ सरकारी कर्मचारी? बेळगावात शिक्षण दुय्यम ठरण्याची भीती

Spread the love

 

बेळगाव : शिक्षक म्हणजे शिक्षणाची जबाबदारी पार पाडणारा कणा; पण सध्या बेळगाव जिल्ह्यातील शिक्षक अनेक प्रशासकीय कामांच्या ओझ्याखाली अक्षरशः गुदमरू लागले आहेत. विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच जनगणना, निवडणूक कामे, बीएलओ, विविध सर्वेक्षणे आणि आता एस एस एल सी निकाल तयार करण्याची जबाबदारी अशी अनेक कामे त्यांच्या माथी मारण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या सुरू असलेल्या भारताची जनगणना 2027 संदर्भातील घरगुती माहिती संकलनासाठी बेळगावातील अनेक शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. आधीच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटत असल्याने “अतिरिक्त” ठरण्याची भीती शिक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यातच जनगणनेचे काम स्वीकारावे लागल्याने शिक्षणाचे मुख्य कार्य दुय्यम ठरत असल्याची भावना शिक्षकांमध्ये व्यक्त होत आहे.
याशिवाय दहावीच्या परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळ यांच्या सूचनेनुसार शिक्षकांना तातडीने माहिती भरून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक शिक्षक सध्या निकालाची तयारी आणि जनगणनेचे काम, बीएलओ या तिहेरी जबाबदाऱ्यांमध्ये अडकले आहेत. परिणामी शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांत निवडणुका, बीएलओ कामे, विविध जातीनिहाय सर्वेक्षणे, शाळाबाह्य मुलांचा शोध, शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण, डिजिटल नोंदी अशा अनेक कामांची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. आता जनगणनेची भर पडल्याने शिक्षकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर आहे.
विशेष म्हणजे शिक्षकांना नियमित मिळणाऱ्या सुट्ट्यांवरही या कामांचा परिणाम झाला आहे. अनेक शिक्षकांना ऑक्टोबर महिन्यातील सुट्टी तसेच एप्रिल–मेच्या उन्हाळी सुट्ट्यांमधूनही प्रशासकीय कामांसाठी बोलावण्यात आले. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही शिक्षकांना मिळालेली नाही, अशी खंत शिक्षक व्यक्त करीत आहेत.
याशिवाय शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे “अतिरिक्त शिक्षक” म्हणून बदली होण्याची भीतीही शिक्षकांना सतावत आहे. एकीकडे विद्यार्थी मिळवण्यासाठी शाळांना पालकांपर्यंत जावे लागत आहे, तर दुसरीकडे शिक्षकांना इतर कामांमध्ये गुंतवून ठेवले जात असल्याने शैक्षणिक गुणवत्ता टिकविणे कठीण होत असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, शिक्षकांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा असतो. मात्र प्रशासकीय कामांचा बोजा वाढत राहिल्यास शिक्षण व्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांना शिक्षणाबाहेरील कामांतून मुक्त करून त्यांच्या मूळ कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सध्या बेळगावातील अनेक शिक्षकांच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे…. “शिकवायचे की सरकारी कामेच करायची?”…

About Belgaum Varta

Check Also

१० हजार बीजरोपणाचा संकल्प पूर्ण; मॉर्निंग वोकर्स ग्रुपतर्फे ऍड. मारुती कामाण्णाचे यांचा सत्कार

Spread the love    बेळगाव : पर्यावरण संवर्धन आणि हरित बेळगावच्या उद्देशाने रेसकोर्स मॉर्निंग वॉकर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *