Monday , August 17 2026
Breaking News

बस धावताना दरवाजे बंद ठेवणे बंधनकारक; नियमभंग करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Spread the love

 

 

बेंगळुरू : प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (NWKRTC) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे बस धावत असताना दरवाजे उघडे ठेवण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, सर्व बसचे दरवाजे प्रवासादरम्यान बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चालक-वाहकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश महामंडळाने दिले आहेत.

बसचे दरवाजे उघडे ठेवून वाहतूक केल्यामुळे अनेक गंभीर अपघात घडल्याच्या घटनांची दखल घेत प्रशासनाने ही कठोर भूमिका घेतली आहे. अनेकदा बस सुरू असतानाच प्रवासी चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी तोल जाऊन खाली पडणे, गंभीर दुखापत होणे किंवा जीवितहानी होण्याच्या घटना घडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

महामंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या असून, स्वयंचलित दरवाजे असलेल्या बसमध्ये त्या यंत्रणेचा नियमित वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. चालक आणि वाहकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही सांगण्यात आले आहे.

या निर्णयामुळे प्रवासी सुरक्षेला मोठा दिलासा मिळणार असून, बसमधून पडण्याच्या आणि निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांवर आळा बसण्यास मदत होणार आहे. महामंडळाच्या या उपक्रमाचे प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *