Monday , August 17 2026
Breaking News

म्हणे महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला; करवेची निदर्शने

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे निदर्शने करत समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी केली. या घडामोडींमुळे आरटीओ सर्कल परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मराठी भाषिकांच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, शासकीय स्तरावर मराठी भाषेचा वापर आणि भाषिक अल्पसंख्याकांशी संबंधित तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी यांसह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन केल्याचा दावा केला.

दरम्यान, समितीचे आंदोलन संपल्यानंतर कर्नाटक रक्षण वेदिकेचे काही कार्यकर्ते आरटीओ सर्कल परिसरात जमले आणि घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यावेळी पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला तसेच वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

त्यानंतर सहाय्यक आयुक्त श्रवणकुमार नायक यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी करत संबंधित संघटनांविरोधात कठोर कारवाईची भूमिका मांडली.

दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थकांनी ही भूमिका फेटाळून लावत आपले आंदोलन लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत शांततापूर्ण पद्धतीने पार पडल्याचा दावा केला. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *