
२६ एप्रिलला भूमिपूजन, ९ मे रोजी चित्रदुर्ग येथे मुख्य कार्यक्रम
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या अभिमानोत्सव कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी रविवारी (ता. २६) सकाळी १० वाजता भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार गोविंद कारजोळ यांनी दिली.
बंगळुरमधील भाजपच्या राज्य कार्यालय ‘जगन्नाथ भवन’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय विजयेंद्र, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार, विधानपरिषदेचे सदस्य तसेच विरोधी पक्षनेते आर. अशोक आणि चलवादी नारायणस्वामी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गोविंद कारजोळ यांनी सांगितले की, “येडियूरप्पा यांनी गेली पाच दशके राज्यभर कार्य केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी लढा दिला, वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी हा अभिमानोत्सव आयोजित करण्यात येत आहे.”
अमित शहांची उपस्थिती
हा भव्य अभिमानोत्सव ९ मे रोजी चित्रदुर्ग येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन येडियूरप्पा यांचा सत्कार केला जाणार आहे. त्याआधी ८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता ‘पुरप्रवेश’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला सुमारे १० लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध समित्या आणि कार्यसंघ तयार करण्यात आले आहेत.
सर्व स्तरातील मान्यवरांना निमंत्रण
राज्यातील विविध मठांचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री, मंत्री, साहित्यिक, कलाकार तसेच समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असेही आयोजकांनी सांगितले.
चित्रदुर्ग हे राज्याच्या भौगोलिक केंद्रस्थानी असल्यानेच या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. “येडियूरप्पा हे खऱ्या अर्थाने जननेते आहेत. त्यांनीच भाजप पक्ष राज्यात स्थीर केला,” असे कारजोळ यांनी नमूद केले.
विजयेंद्र यांचा दावा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सांगितले की, “येडियूरप्पा यांच्या योगदानाची दखल सर्व समाजघटक घेतात. त्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत भव्य आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होतील. हा सोहळा ऐतिहासिक ठरेल.”
या कार्यक्रमात प्रभागातील अनेक नेते, ज्यामध्ये प्रभाकर कोरे, गोविंद कारजोळ आणि श्रीरामुलू यांचाही सहभाग असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta