Monday , June 22 2026
Breaking News

कष्ट शिक्षकांचे… श्रेय अधिकाऱ्यांचे; निकालानंतर शिक्षण खात्यात ‘श्रेय युद्ध’

Spread the love

 

वर्षभर विद्यार्थ्यांसाठी झटलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी; काही अधिकाऱ्यांचे फ्लायर्स सोशल मीडियावर व्हायरल

बेळगाव (प्रतिनिधी) : यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांचा निकाल समाधानकारक लागल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना शिक्षण विभागात मात्र निकालाचे श्रेय घेण्यावरून अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे. वर्षभर विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या शिक्षकांच्या कष्टावर पाणी फेरत काही अधिकारी “आपल्यामुळेच निकाल सुधारला” असा दावा करत स्वतःच्या नावाचे फ्लायर्स तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माहितीनुसार, अनेक शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. सकाळ-सायंकाळ विशेष वर्ग, मंद गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे मार्गदर्शन, नियमित चाचण्या, पालकांशी सातत्याने संपर्क, तसेच परीक्षेपूर्व तयारीसाठी अतिरिक्त मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा थेट परिणाम शाळांच्या निकालावर दिसून आला. त्यामुळे शहर, तालुका आणि जिल्ह्याच्या एकूण निकालातही सकारात्मक वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र निकाल जाहीर होताच काही अंतर्गत अधिकाऱ्यांनी या यशाचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. “आपल्या मार्गदर्शनामुळे आणि नियोजनामुळेच निकाल सुधारला” असा दावा करत काही अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नावाचे फ्लायर्स आणि पोस्टर्स तयार करून त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार सुरू केला आहे. काही ठिकाणी तर असे फ्लायर्स बनवून घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात रंगली आहे.
या प्रकारामुळे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसोबत वर्षभर मेहनत करणाऱ्या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. शिक्षकांचे म्हणणे आहे की, निकाल सुधारण्यासाठी घेतलेल्या विशेष वर्गांपासून ते विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पालकांशी संवाद साधण्यापर्यंत अनेक प्रयत्न शिक्षकांनी केले. अनेक शिक्षकांनी स्वतःचा वेळ आणि खर्च करून विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन दिले. त्यामुळे निकालाचे श्रेय हे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.
शिक्षक संघटनांमधूनही या प्रकारावर नाराजी व्यक्त होत असून “वर्षभर शिक्षकांवर विविध शासकीय कामांचा ताण टाकला जातो, मात्र निकाल लागल्यानंतर श्रेय घेण्यासाठी काही अधिकारी पुढे येतात” अशी टीका होत आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने मेहनत करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, निकालाचे श्रेय घेण्यासाठी सुरू झालेली ही ‘श्रेयाची स्पर्धा’ सध्या शिक्षण विभागात चर्चेचा विषय ठरली असून यामुळे शिक्षक आणि अधिकारी यांच्यातील नाराजी उघडपणे समोर येत असल्याचे चित्र आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन मध्ये दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *