

बेळगाव : बेलगाम डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशन यआणि कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव ९ आणि १० मे रोजी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू यांनी आज गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना प्रभू पुढे म्हणाले, हॉटेल नेटिव येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ब्रिज स्पर्धेत मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी गोवा बेंगळूर व अन्य राज्यातील शंभरहून अधिक ब्रिज स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना एक लाख रुपयांची रोख पारितोषिके,स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला कर्नाटक भेज असोसिएशन त्याचबरोबर अन्य मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ब्रिज खेळाडू संदर्भात अधिक माहिती देताना प्रभू पुढे म्हणाले, ब्रिज (Bridge) हा जगातील १०० हून अधिक देशांमध्ये खेळला जाणारा एक लोकप्रिय पत्त्यांचा खेळ आहे. इतर अनेक पत्त्यांच्या खेळांप्रमाणे हा केवळ नशिबावर आधारित नसून, तो खऱ्या अर्थाने बहुप्रकारच्या कौशल्यांची कसोटी पाहणारा खेळ आहे. म्हणूनच ब्रिजला जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा चौकटीतही मान्यता मिळालेली आहे.
हा खेळ स्मरणशक्ती वाढवतो, जोडीदारांमधील परस्पर समज अधिक दृढ करतो आणि संघभावना निर्माण करतो. तसेच नवकल्पना, कल्पनाशक्ती, संभाव्यतेचे विश्लेषण आणि अचूक अंमलबजावणी यांसारखी कौशल्ये विकसित करण्यास मदत करतो. ब्रिजमध्ये जिंकणे-हरणे हे दुय्यम असते; खरी मजा आणि महत्त्व मानसिक व्यायामात असते.
ब्रिज नियमित खेळणे मेंदूसाठी उत्तम व्यायाम आहे. तो मानसिक ताजेपणा वाढवतो आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये होणारी स्मरणशक्तीची घसरण व मानसिक थकवा कमी करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करतो.
या सुंदर खेळासाठी योग्य असे एक घोषवाक्य असे असू शकते :ते म्हणजे “दररोज काही डाव खेळा, व चिंता दूर पळवा!” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संस्थेचे सेक्रेटरी एम. आय. हेगडे, नंदकुमार देशपांडे, संतोष ममदापुरे, आर. एल. बर्वे आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta