


माजी मंत्री वीरकुमार पाटील; बोरगावमध्ये अभिवादन
निपाणी (वार्ता) : सहकार रत्न दिवंगत रावसाहेब पाटील सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर देत होते. त्यांनी सहकार, शिक्षण, सामाजिक आणि ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे अनेक सहकारी संस्था सक्षम झाल्या आणि शेतकऱ्यांना विकासाची नवी दिशा मिळाली असल्याचे मत माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केले.
बोरगाव येथे अरिहंत परिवारातर्फे दिवंगत रावसाहेब पाटील यांच्या द्वितीय स्मृतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अरिहंत को-ऑप सोसायटी, प्राथमिक कृषी संघ, अरिहंत शाळा, कॉलेज, स्पिनिंग मिल, साखर कारखाना आणि पाटील कुटुंबीया तर्फे रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. येथील सरकारी कन्नड उर्दू मराठी मुलांची शाळा व मुलींची शाळा येथे अरिहंत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी, शहराच्या विकासासाठी आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी दिवंगत रावसाहेब पाटील यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
दत्त कारखान्याचे संचालक संजय देसाई यांनी, दादा हे सहकार क्षेत्रातील दूरदृष्टीचे नेतृत्व होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास याप्रसंगी अरिहंत संस्थेचे अध्यक्ष अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, अरिहंत संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, कृषी संघाचे उपाध्यक्ष सुमित रोड्ड, अरुण बोने, हबीब जमादार ,चंदू पाटील, अब्दुल पटेल, संजय पाटील, वर्धमान पाटील, सभापती प्रदीप माळी, शिवाजी तोडकर, महावीर पाटील, राजू मगदूम, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, कृषी संघाचे सीईओ आर. टी. चौगुला, अभयकुमार खोत, अभिनंदन बेनाडे, भरत गुंडे, राकेश फिरगन्नावर, सुशीला माळी यांच्यासह अरिहंत परिवाराचे सदस्य, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta