


खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात दि. १९ जून रोजी पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळावा यासाठी ‘EVM Simulator App’ चा वापर करण्यात आला. या निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रा. जयश्री शिवटनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद एल. पाटील यांनी निवडणूक आयुक्त म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्याच कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदान प्रक्रिया कमालीची शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली. कला व वाणिज्य शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभाग घेतला. वर्ग प्रतिनिधी, जनरल सेक्रेटरी, सांस्कृतिक मंत्री, शिक्षण मंत्री, पर्यटन मंत्री, क्रीडा मंत्री आणि शिस्त मंत्री या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
या चुरशीच्या निवडणुकीच्या निकालानुसार कु. वैशाली गुरव हिची जनरल सेक्रेटरी (GS) म्हणून तर वैष्णवी देवळी यांची डेप्युटी GS म्हणून निवड झाली. तसेच कु. पायल लाटगावकर यांची शिक्षण मंत्री कु. स्नेहा गावडे यांची सांस्कृतिक मंत्री, कु. प्रणाली पाटील यांची शिस्त मंत्री कु. अपेक्षा निलजकर यांची क्रीडा मंत्री आणि कु. सानिया गाडी यांची पर्यटन मंत्री म्हणून निवड झाली. यासोबतच प्रथम व द्वितीय कला आणि वाणिज्य विभागातील वर्ग प्रतिनिधी म्हणून कु. सोनी कारेकर, कु. जोया सनदी, कु. दिशा नंदगडकर आणि कु. राजश्री गावडा यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक एन. ए. पाटील, टी. आर. जाधव, एस. सी. कणबरकर, एम. वाय. देसाई, पी. व्ही. कर्लेकर, आर. व्ही. मतीतम नवर, श्रीमती आर. पी. घाडी, चित्रा आणि श्रीमती पूजा गुरव या सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच प्रा. नितीन देसाई सरांनी आणि संगणक तज्ज्ञ सीमा यांनी टेक्नॉलॉजिस्ट म्हणून डिजिटल तांत्रिक बाजू सांभाळली, तर शिपाई सातेरी घाडी यांनी व्यवस्थापकीय सहकार्य केले.

ताराराणी महाविद्यालयातील हे आयोजन म्हणजे आधुनिक काळातील बदलांचे आणि तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीचे एक आदर्श सहप्रात्यक्षिक उदाहरण ठरले आहे. पारंपरिक निवडणूक पद्धतींमध्ये कागदी मतपत्रिका, शिक्के आणि मतपेट्यांचा वापर केला जातो, ज्यामध्ये वेळ, कागद आणि मनुष्यबळ प्रचंड प्रमाणात लागते. मात्र, या महाविद्यालयाने ‘EVM Simulator App’ चा वापर करून आधुनिक डिजिटल युगाची पावले ओळखली. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष स्क्रीनवर क्लिक करून मतदान केले. हे प्रात्यक्षिक दाखवते की, आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि पर्यावरणपूरक कशी करू शकते.
या आधुनिक निवडणूक प्रक्रियेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अचूकता, पारदर्शकता आणि वेगवान निकाल. पारंपरिक पद्धतीत मतमोजणीसाठी तासनतास लागायचे, मात्र येथे ॲपच्या वापरामुळे निकाल काही मिनिटांत समोर आले. प्रा. नितीन देसाई व संगणक तज्ज्ञ सीमा यांचे तांत्रिक कौशल्य आणि प्राचार्य श्री. अरविंद एल. पाटील यांचे निवडणूक आयुक्त म्हणून लाभलेले नेतृत्व यांमुळे विद्यार्थिनींना निवडणूक आयोगाच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा जिवंत अनुभव मिळाला. तसेच, निवडणूक केवळ एका ‘लीडर’ पुरती मर्यादित न ठेवता, जसे देशात मंत्रिमंडळ असते, अगदी तशीच रचना येथे करून विविध खात्यांच्या मंत्र्यांची केलेली निवड लोकशाहीतील कामांचे विकेंद्रीकरण शिकवणारी ठरली. अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थिनी देशाच्या मुख्य निवडणूक प्रक्रियेत भाग घेतील, त्यापूर्वीच महाविद्यालयात मिळालेला हा प्रत्यक्ष अनुभव त्यांना एक सजग मतदार बनवण्यास मदत करेल. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये लोकशाही मूल्ये, नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि संघटन कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली असून हा डिजिटल उपक्रम इतर शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक ठरला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta