Sunday , August 16 2026
Breaking News

सेल्फी ठरली जीवघेणी; कावेरी नदीत एकाच कुटुंबातील चार महिलांसह चालकाचा बुडून मृत्यू

Spread the love

 

बंगळूर : कावेरी नदीच्या काठावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिला आणि त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या कारचालकाचा बुडून मृत्यू झाला. मंड्या जिल्ह्यातील मळवळ्ळी तालुक्यातील मुत्तती येथे बुधवारी सायंकाळी ही हृदयद्रावक घटना घडली.

मृतांमध्ये विजयम्मा (५०), श्वेता (३८), प्रियंका (२८), चैत्रा (२०) आणि कारचालक महेश (सर्व रा. ब्याडरहळ्ळी, जि. रामनगर) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त कनकपूर येथे आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी मुत्तती येथील अंजनेय मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर विजयम्मा कावेरी नदीच्या काठावर सेल्फी घेत असताना त्यांचा तोल जाऊन त्या नदीत पडल्या.

आईला वाचवण्यासाठी प्रियंका यांनी पाण्यात उडी घेतली. त्यानंतर दोघींना मदत करण्यासाठी श्वेता आणि चैत्रा या देखील नदीत उतरल्या. मात्र, चौघींनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्या.

महिलांचा आक्रोश ऐकून कारचालक महेश यांनी धाडसाने नदीत उडी घेतली. मात्र, घाबरलेल्या महिलांनी त्यांना पकडून धरल्याने तेही स्वतःचा जीव वाचवू शकले नाहीत. अखेर पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या; आईसह चौघांना अटक

Spread the love  बिदर : दोन महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला आईसह कुटुंबातील सदस्यांनी विहिरीत फेकून देत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *