


बेळगाव : आर. सर्व्हिसेस डेव्हलपर्स बेळगावच्या संचालिका डॉ. राजश्री राजू तुडयेकर यांच्याकडून सावगाव येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला संगणक संच देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा, सावगाव येथे सागर सावगावकर यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून देणगीदार डॉ. राजश्री राजू तुडयेकर उपस्थित होत्या. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर श्री सरस्वती फोटोपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री एल. एस. चांदीलकर यांनी प्रास्ताविक केले. देणगीदार डॉ. राजश्री राजू तुडयेकर यांचा परिचय संजय गौंडाडकर यांनी करून दिला. यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यात आपले अनमोल योगदान देणाऱ्या डाॅ. राजश्री यांचा शाळेच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान सोयी सुविधा पैकी संगणक संच मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. राजश्री तुडयेकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात संगणकाला अनन्यसाधारण महत्व असल्याचे सांगून सर्वांनी संगणकाचा योग्य वापर करून आपला शैक्षणिक विकास साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास शिवसेना उपशहर प्रमुख प्रदीप सुतार व श्री प्रवीण तेजम, तसेच युवासेना बेळगावचे अध्यक्ष विनायक हुलजी, सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा वाघवडेकर, एसडीएमसी सदस्य राजू कदम, ओमाना हिंडलगेकर, गजानन घाटेगस्ती, शाळेचे शिक्षक -शिक्षिका श्रीमती आर. एस. मोतेकर, आर. डी. पाटील, श्रीमती आर. एन. कदम, आय. जे. कांबळे, संतोष खेमजी, एस. एन. इटगीकर आदींसह शाळेचे विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गौंडाडकर यांनी केले, तर एल. एस. चांदीलकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta