Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव – गोवा आणि बेंगळूरू – मुंबई नवीन रेल्वे सेवांच्या मागणीला गती द्या

Spread the love

 

खासदार जगदीश शेट्टर यांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक
बेळगाव : लोकसभा मतदारसंघातील विविध रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी सोमवारी हुबळी येथे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक के. अनंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.

बैठकीत बेळगाव – कित्तूर – धारवाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अद्याप रेल्वेकडे हस्तांतरित न झाल्यामुळे काम रखडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुमारे १,४३० एकर जमिनीचे भूसंपादन निश्चित झाले असले, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जमीन रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया थांबली आहे.

या संदर्भात जिल्हास्तरावर यापूर्वी चर्चा झाल्याचे सांगून, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून प्रक्रिया वेगवान करण्याचा प्रयत्न करू, असे शेट्टर यांनी स्पष्ट केले.

बैठकीत बेळगाव–पारकनट्टी–गोकाक–यादवाड या प्रस्तावित रेल्वेमार्गावरही चर्चा झाली. या परिसरात सिमेंट उद्योग आणि साखर कारखान्यांची मोठी संख्या असल्याने या मार्गाला औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असल्याचे शेट्टर यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक गरज आणि औद्योगिक मागणी लक्षात घेऊन हा प्रस्ताव पुन्हा रेल्वे मंडळाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकपूर–रामदुर्ग–सौंदत्ती –धारवाड या नव्या रेल्वेमार्गाचाही बैठकीत उल्लेख झाला. सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भेट देत असल्याने या मार्गाची आवश्यकता असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. प्रारंभी या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. या सर्वेक्षणासाठी सुमारे ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, रेल्वे मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रस्ताव सध्या रेल्वे मंडळाच्या विचाराधीन असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

‘पंतप्रधान अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत सुरू असलेल्या बेळगाव आणि घटप्रभा रेल्वे स्थानकांच्या विकासकामांचा वेग कमी असल्याबद्दल खासदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी सांब्रा आणि देसूर स्थानकांचा पर्यायी टर्मिनल म्हणून विकास करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.

बैठकीत बेळगाव – मनुगुरू रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावावरही विचारविनिमय झाला. सिकंदराबाद, हैदराबाद आणि चार्लापल्ली या शहरांशी जोडल्या जाणाऱ्या सेवा बेळगावीहून सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

याशिवाय, बेळगाव मार्गे प्रस्तावित बेंगळूरू – मुंबई रेल्वे सेवेचाही आढावा घेण्यात आला. हा प्रस्ताव सध्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून, लवकरच त्यास हिरवा कंदील मिळण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेवा सुरू झाल्यानंतर बेंगळूरू आणि मुंबई दरम्यानचा प्रवास बेळगावमार्गे सुमारे २३ तासांत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

बेळगाव – लोंढा – गोवा या नव्या रेल्वे सेवेची मागणीही शेट्टर यांनी बैठकीत लावून धरली. प्रादेशिक संपर्क सुधारण्यासाठी आणि प्रवाशांची दीर्घकालीन गरज लक्षात घेऊन ही सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *