Monday , September 21 2026
Breaking News

ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली ७ वे अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन २४ मे रोजी

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी येथे दिमाखात संपन्न होणार आहे. हे संमेलन तीन सत्रांमध्ये पार पडणार असून साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा जागर उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली.

या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि व्याख्याते यशवंत पाटणे यांची एकमुखाने निवड करण्यात आली आहे. आपल्या प्रभावी लेखनशैली आणि ओजस्वी वक्तृत्वामुळे त्यांनी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘शेकोटी’, ‘स्वरगंगेच्या काठी’, ‘सहावे सुख’, ‘चैतन्याचे चांदणे’ आणि ‘जगाच्या कल्याणा’ यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती वाचकप्रिय ठरल्या आहेत. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
नुकत्याच मराठा मंदिर येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत संमेलनाच्या तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी. बी. पाटील, शिवसंत संजय मोरे, एम. वाय. घाडी, रणजित चौगुले, एल.पी. पाटील, एम. के. पाटील, मोहन अष्टेकर, संजय गौडाडकर, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे-पाटील, रोशनी हुंद्रे, मनीषा नाडगौडा, सविता वेसणे, गीता घाडी, संजिवनी खंडागळे, नेत्रा मेणसे, स्मिता मेंडके आणि स्मिता किल्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *