Monday , May 25 2026
Breaking News

बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले : बसवंत शहापूरकर

Spread the love

 

बेळगाव : पत्रकारिता म्हणजे नेमकं काय ते एम.डी.मुल्ला यांनी आपल्या लेखणीतून इतर पत्रकारांना आणि लोकांना दाखवून दिलं. त्यांच्या निधनाने बेळगावच्या पत्रकारिताक्षेत्रातील निर्भिड व्यक्तिमत्व हरपले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बसवंत शहापूरकर यांनी केले.

बेळगावचे ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधन निमित्त आज शनिवारी सायंकाळी मराठा मंदिर येथे मराठी पत्रकारांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुढे बोलताना बसवंत शहापूरकर म्हणाले, एम. डी. मुल्ला हे एक निर्भीड पत्रकार होते. त्यांचा पोलीस प्रशासनावर मोठा प्रभाव होता. अनेकांना ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत असत.

यावेळी बोलताना शिवराज पाटील म्हणाले, उर्दू भाषिक असलेले एम. डी. मुल्ला यांचे मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. धाडसी वृत्ती, मिश्किल स्वभाव ही त्यांची खासियत होती. बेळगावातील गुन्हेगारांवरही त्यांचा वचक होता. गुन्हेगारी जगतातील माहिती खोलवर जाणून घेत त्यांनी नेहमी आपले काम प्रभावीपणे केले.

शिवाजी शिंदे म्हणाले बेळगावच्या पत्रकारितेतील एक महत्त्वाचे नाव म्हणून एम. डी. मुल्ला यांचा उल्लेख करावा लागेल. त्याकाळी संपर्काची साधने आणि प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी केलेले आदर्शवत कार्य आजच्या पत्रकारांना निश्चितच प्रेरणा देणारे आहे.

संजय सूर्यवंशी म्हणाले, एम. डी. मुल्ला यांच्याकडून बरेच काही शिकता आले. दिलदार मनाचा माणूस, त्याचबरोबर त्यांची नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची चिकित्सकवृत्ती पत्रकारांना प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

श्रीकांत काकतीकर म्हणाले, एम. डी. मुल्ला बेळगावच्या क्राईम न्यूज क्षेत्रातील महत्त्वाचे नाव मानले जाते. दुसऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत झोकून देऊन काम करण्याची त्यांची वृत्ती त्याच्याबरोबर काम करणार्‍यांसाठी एक आदर्श होता. त्यांच्या सोबत काम करणार्‍या वार्ताहरांना ते नेहमीच प्रोत्साहन देत होते

उपेंद्र बाजीगर म्हणाले, माध्यम आणि शोधपत्रकारांनी ठरवलं तर काय होऊ शकतं हे मुल्ला यांच्या पत्रकारितेतून दिसतं. गुन्हेगारी जगतातील बातम्यांबरोबरच त्यांनी समाजाची काळजी घेण्याचा नेहमीच ध्यास घेतला होता. रणजीत चौगुले म्हणाले, बातमी कशी असावी, फिल्डवर जाऊन काम करणे हे मुल्ला यांच्या पत्रकारितेचे महत्त्वाचा पैलू होता.

प्रारंभी स्तब्धता पाळून दिवंगत पत्रकार एम. डी. मुल्ला तसेच शब्दगंध कवी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य वेंकटेश श्रीनिवास वाळवेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेला पत्रकार सुहास हुद्दार, डी. बी. पाटील, सतीश जाधव, रोहन पाटील, अनंत कुचेकर, रवींद्र जाधव, रवींद्र पाटील, यांच्यासह ऍड. सुधीर चव्हाण, संजय गौंडाडकर, महादेव चौगुले, एम.वाय.घाडी, डॉक्टर संजीवनी खंडागळे, रोशनी हुंदरे, सविता वेसणे, नेत्रा मेणसे, गीता घाडी व अन्य सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनासाठी समिती सज्ज; बैठकीत रणनीतीवर चर्चा

Spread the love  बेळगाव : शहर महाराष्ट्र समितीची रविवारी रंगुबाई पॅलेस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *