Sunday , July 26 2026
Breaking News

मच्छे येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Spread the love

 

मच्छे : श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने मच्छे गावातील दहावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा श्री रोहन बने सर उपस्थित होते. तसेच “दहावीनंतर काय?” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव येथील ज्येष्ठ व्याख्याते श्री. विनोद देशपांडे (B.Sc, LLB, MBA) हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी गावातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या वतीने श्री रोहन बने सर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी रोहन बने यांनी आपल्या मनोगतात बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयातील युवकांचे विशेष कौतुक केले. “आज अनेक तरुण मोबाईल आणि विविध व्यसनांच्या आहारी जात असताना वाचनालयातील युवक सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “आत्ताची पुढील चार वर्षे चिकाटीने अभ्यास केला तर पुढील पन्नास वर्षे आनंदात जातील; पण आज वेळ वाया घालवला तर पुढील आयुष्य संघर्षमय होईल,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

व्याख्याते श्री विनोद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक शाखांची सविस्तर माहिती दिली. आयटीआयपासून आयआयटीपर्यंत, तसेच विज्ञान, वाणिज्य, कला आदी शाखांमधील करिअर संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “मित्रांनी घेतली म्हणून शाखा निवडू नका; प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगळी क्षमता असते. स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घ्या,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात कोणतीही शैक्षणिक अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमास श्रीधन बाळेकुंद्री, सुशील धामणेकर, शिवा नावगेकर, किरण सुतार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनायक चौगुले सर यांनी केले.

यावेळी मच्छे गावातील सर्वोच्च गुण संपादन करणारी विद्यार्थिनी कु. प्राची पाटील हिला किरण सुतार यांनी स्वतः सुपारीमध्ये अत्यंत आकर्षक व कलात्मक पद्धतीने तयार केलेले शिल्प भेट स्वरूपात प्रदान केले. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता व कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा क्षण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयातील सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *