Sunday , July 26 2026
Breaking News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा समितीचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. बेळगावातील मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत सीमाप्रश्न, मराठी भाषिकांवरील अन्याय आणि कन्नड संघटनांच्या हालचालींविरोधात विविध आंदोलनात्मक निर्णय घेण्यात आले.

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्यामुळे सीमावासीयांमध्ये नाराजी वाढत आहे. तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीच्या बैठका गेल्या दोन वर्षांपासून न झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

बैठकीत १ जून रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा याचे नियोजन करण्यात आले. तसेच कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सर्व घटक समित्यांच्या बैठका घेऊन आंदोलनाची तारीख जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देत, बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोकसंख्या असल्यामुळे सरकारी परिपत्रके मराठीत उपलब्ध व्हावीत, अशी मागणी समितीने पुन्हा केली. सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिक ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

कर्नाटक सरकार कन्नड संघटनांना पाठबळ देत असल्याचा आरोप करत, मराठी भाषिकांना सातत्याने डिवचण्याचे प्रकार सुरू असल्याची टीका समितीकडून करण्यात आली. परिस्थितीत बदल न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.

या बैठकीला कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, आबासाहेब दळवी, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर, विकास कलघटगी यांच्यासह समितीचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *