Sunday , September 20 2026
Breaking News

साहित्यसेवेचा आधारवड डॉ. शरद गोरे यांची ७ व्या बेळगाव साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार

Spread the love

 

३२ वर्षांत १९६ संमेलनांचा विक्रम, हजारो नवोदितांना घडवले

बेळगाव : मराठी साहित्याच्या क्षितिजावर अखंड तेवणारा तारा, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद मधुकर गोरे येत्या २४ मे २०२६ रोजी होणाऱ्या ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाला सन्मानीय उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र मारूती पाटील यांनी दिली. ७ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनास लोकनेते अजितदादा पवार असे नाव देण्यात आले आहे, श्री. गोरे यांनी लेखक दिग्दर्शक व संगीतकार, अभिनेता म्हणून ६ मराठी चित्रपट केले आहेत, त्यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या एक प्रेरणादायी प्रवास सूर्या या मराठी चित्रपटासास कान्स व बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत,

एक तपस्वी, एक चळवळ
१९९३ साली पुण्यातून सुरू झालेला हा साहित्य यज्ञ आज ९ राज्यांत ४६६ शाखा आणि २० हजार सभासदांपर्यंत* पोहोचला आहे. डॉ. गोरे यांच्या दूरदृष्टीमुळे केवळ शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यातील बोलीभाषेला, नवोदितांच्या कवितेला आणि ग्रामीण अनुभवांना राष्ट्रीय विचारपीठ
मिळाले.

१९६ संमेलने, एक इतिहास
गेल्या तीन दशकांत डॉ. गोरे यांनी १९६ साहित्य संमेलने यशस्वी केली. त्यात ३२ नवोदित, २० ग्रामीण, १९ महात्मा फुले प्रबोधन, १८ छत्रपती संभाजी महाराज, १४ उत्तर महाराष्ट्र ग्रामीण, ८ युवा, ७ छत्रपती शिवाजी महाराज, ६ अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनांचा* समावेश आहे. सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ, ग. दि. मा., नारायण सुर्वे, गाडगेबाबा यांच्या नावाने संमेलने घेऊन त्यांनी महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचवले. मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलन घेऊन मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला.

बेळगावशी ऋणानुबंध
सीमाभागातील मराठी अस्मितेचा हुंकार बुलंद करण्यासाठी परिषदेने बेळगावात यापूर्वी सहा संमेलने घेतली. यंदाचे सातवे संमेलन अधिक व्यापक व दर्जेदार व्हावे यासाठी डॉ. गोरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.

“साहित्य हे फक्त वाचायचे नसते, जगायचे असते. ग्रामीण भागातील शेवटच्या माणसाची व्यथा कागदावर आली पाहिजे,” हा डॉ. गोरे यांचा मंत्र आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे बेळगावच्या साहित्य संमेलनाला वैचारिक उंची मिळेल, असा विश्वास सीमाकवी रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.

२४ मे २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, मराठा मंदिर येथे हा साहित्य सोहळा रंगणार असून सीमाभागातील हजारो साहित्यप्रेमी डॉ. गोरे यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *