Monday , May 25 2026
Breaking News

गुरु-शिष्य नात्याचा भावस्पर्शी सोहळा : शाळा नं. 19 च्या 1993 बॅचचा गुरुवंदना व स्नेहमेळावा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील सरकारी मराठी मुला- मुलांची शाळा नंबर 19 च्या 1987 ते 1993 बॅचवतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेहमेळावा कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 33 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणी, मित्रांची साथ आणि शिक्षकांचे प्रेम यामुळे संपूर्ण परिसर भावनांनी भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थिनींनी गुरुजनांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शाळेतील दिवंगत माजी विद्यार्थी आणि गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुजनांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व गुरुजनांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अनेक वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून मिळालेला हा सन्मान स्वीकारताना अनेक गुरुजन भावूक झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. ज्योती जिवण्णावर टीचर यांनी आपल्या मनोगतात मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुले जीवनात अधिक सक्षम आणि यशस्वी होतात. मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्या संस्कृतीशी आणि भाषेशी नाते अधिक घट्ट असते. मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचे मोठे कार्य मराठी माध्यमातील विद्यार्थीच करू शकतात,” असे त्या म्हणाल्या. सध्या पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढता कल पाहता मराठी शाळांची पटसंख्या कमी होत असून मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी एक वेगळे भावनिक नाते तयार होते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेले विद्यार्थी आजही आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतात, हीच खरी शिक्षणाची ताकद आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले.
यावेळी श्रीमती मंदाकिनी एम. सुभेदार, श्रीमती सुरेखाताई सदाशिवराव कुलकर्णी, सौ. सुनीता जिनाप्पा पाटील (कडोलकर), सौ. मंदाकिनी मनोहर देसाई, श्रीमती कुसुम के. राणे, सौ. सविता चंद्रकांत चंदगडकर (निकम), श्रीमती मनीषा महादेव खन्नूकर (पवार) आदी गुरुजनांनीही आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वेदांत विजय शिखरे,
अमीर इमरान पठाण, प्रीती कृष्णा शेलार, स्वयम राजेश दिवाकर, पुनम मनोहर पाटुकले या पाल्यांचा व गुरुजनांच्या आर्या नरसिंह जिवण्णावर, वेदांत विवेक पाटील,
श्रेयस विकास देसाई या नातवंडांचा विशेष गौरव करण्यात आला.
माजी विद्यार्थी विनायक गावडे, वृंदा वेसणे, चंद्रशेखर चव्हाण आणि सुहास हुद्दार यांनी आपल्या भावना व्यक्त करत गुरुजनांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय शिक्षकांना करून देत जुन्या आठवणींना पुन्हा एकदा जिवंत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गावडे यांनी तर आभार प्रदर्शन अर्चना किल्लेदार यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थ्यांसह अळवण गल्ली परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनासाठी समिती सज्ज; बैठकीत रणनीतीवर चर्चा

Spread the love  बेळगाव : शहर महाराष्ट्र समितीची रविवारी रंगुबाई पॅलेस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *