बेळगाव : कर्नाटक विधीमंडळाचे यंदाचे पावसाळी अधिवेशन प्रथमच बेळगावातील सुवर्णसौध येथे भरविण्याची दाट शक्यता व्यक्त होत असून, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत हिवाळी अधिवेशनासाठी ओळखल्या जाणाऱ्या बेळगावात यंदा जुलै अथवा ऑगस्ट महिन्यात अधिवेशन होण्याच्या हालचालींना वेग आल्याने शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार हे अधिवेशन जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता असून ते सुमारे दहा दिवस चालू शकते. या कालावधीत राज्यभरातून आमदार, विधान परिषद सदस्य, वरिष्ठ अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस दल बेळगावात दाखल होणार असल्याने प्रशासनासमोर निवास, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तब्बल पाच हजारांहून अधिक व्यक्तींच्या व्यवस्थेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत शहरातील हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊसेस आणि निवासी अपार्टमेंटमधील उपलब्ध खोल्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगाऊ आरक्षणाबाबतही चर्चा झाली असून विश्वेश्वरैया तंत्रज्ञान विद्यापीठ, वन विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहांमध्येही विशेष व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. पंचतारांकित हॉटेल्सपासून सर्वसामान्य निवास सुविधांपर्यंत सर्व पर्यायांचा प्रशासनाकडून अभ्यास केला जात आहे.
या संभाव्य अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील सिंचन प्रकल्प, प्रादेशिक विकास, कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटक भागांसाठी विशेष निधीच्या मागण्या यांसारखे महत्त्वाचे विषय चर्चेत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पावसाळ्यात अधिवेशन घेण्यामुळे प्रशासनासमोर काही नवी आव्हानेही निर्माण होणार आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि निवासाचे नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागणार आहे. इंधन दरवाढीमुळे वाहन भाड्यात वाढ होण्याची शक्यता असून हॉटेल्समधील निवास व भोजन खर्चही वाढू शकतो. त्यामुळे यंदाचे अधिवेशन अधिक खर्चिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी प्राथमिक सूचना मिळाल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. “पहिल्या टप्प्यातील सुविधांची पाहणी करण्यात आली असून मिळालेल्या निर्देशांवरून अधिवेशन होण्याची शक्यता अधिक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामुळे लग्नसराईच्या काळात बेळगावमध्ये हॉटेल आरक्षणाची मोठी समस्या निर्माण होत असे. अनेक नागरिकांना आरक्षण रद्द होणे किंवा खोल्या उपलब्ध न होण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यंदा अधिवेशन पावसाळ्यात होण्याची शक्यता असल्याने त्या समस्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, पावसाळ्यातील नव्या व्यवस्थापकीय अडचणींवर प्रशासनाला प्रभावी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta