Sunday , September 20 2026
Breaking News

भटकळ समुद्रकिनारी दुर्दैवी दुर्घटना; एकाच कुटुंबातील आठ जणांचा बुडून मृत्यू

Spread the love

 

उत्तर कन्नड : भटकळ तालुक्यातील तट्टेहक्कल समुद्रकिनाऱ्यावर रविवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील आठ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण उत्तर कन्नड जिल्ह्यात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर कापेचिप्पू (शंख-शिंपले) गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक समुद्राच्या पाण्याचा वेग वाढल्याने काही जण खोल पाण्यात ओढले गेले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर सदस्यही पाण्यात अडकले आणि दुर्दैवाने आठ जणांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही करण्यात आली. या दुर्घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

या घटनेबद्दल उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.

तसेच, पीडित कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *