Monday , September 21 2026
Breaking News

रयत गल्ली, वडगाव येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तीमय वातावरणात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : रयत गल्ली, माधवपूर वडगाव येथे श्री बाल भजनी मंडळ, श्री शिवजयंती उत्सव मंडळ आणि श्री गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री ज्ञानेश्वर पारायण सेवा मंडळ, राजवाडा कंपाउंड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे. परिसरात सध्या नामस्मरण, भजन, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

या पारायण सोहळ्यास धामणे येथील ह.भ.प. श्री मारुती नागेंद्र सांबरेकर यांचे अधिष्ठान लाभले असून उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी मारुती होसुरकर, राजू मरवे, मंगेश नागोजीचे, फकीरा कुंडेकर, गोपाळ बिर्जे, नेताजी जाधव, उत्तम तारीहाळकर, संतोष काजोळकर, वंदना होसुरकर, सुरेश होसुरकर, श्रीधर खन्नूकर आणि केदारी तारीहाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पारायण सोहळ्याच्या निमित्ताने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९व्या, १२व्या आणि १८व्या अध्यायांचे वाचन व पारायण करण्यात येत आहे. वडगाव व परिसरातील वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. शनिवारी पहाटे ५ वाजता श्री बाल भजनी मंडळ वडगाव आणि श्री ज्ञानेश्वरी भजनी मंडळ यांच्या काकड आरतीने दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यानंतर श्री ज्ञानेश्वरी महिला भजनी मंडळ, वडगाव यांचे भजन तसेच श्री सिद्धेश्वर भक्त भजनी मंडळ, काकती यांचे सांप्रदायिक भजन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. बाळू भक्तीकर महाराज (तुरमुरी) यांचे प्रवचन, तर रात्री ७.३० वाजता देहूचे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे विद्यावंशज ह.भ.प. श्री पुंडलिक महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे.

उद्या रविवारी सोहळ्याच्या अंतिम दिवशी काकड आरती, ग्रंथवाचन, काला कीर्तन, महाप्रसाद वितरण आणि दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप होणार असून सायंकाळी ५ वाजता दिंडीद्वारे पारायण सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासाचे औचित्य साधून हा पारायण सोहळा आयोजित केला जातो. शेतीच्या कामांमध्ये व्यस्त असणारे रयत गल्लीतील शेतकरी या काळात भक्ती आणि श्रम यांचा सुंदर संगम साधत पारायणात सहभागी होतात. सोहळ्याच्या आयोजनापासून महाप्रसाद, स्वच्छता आणि भाविकांच्या सेवापर्यंत सर्व जबाबदाऱ्या स्थानिक ग्रामस्थ, महिला, युवक आणि वारकरी मंडळी उत्साहाने पार पाडत आहेत.

भक्ती, सेवा आणि सामूहिक सहभाग यांचा सुंदर संगम घडवणारा हा पारायण सोहळा परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन करणारा ठरत असून भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *