Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरात बेकायदेशीर गावठी बंदूक निर्मिती रॅकेटचा पर्दाफाश; १३ आरोपी अटकेत

Spread the love

 

बेळगाव : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी बंदूक निर्मिती आणि विक्रीच्या रॅकेटचा खानापूर पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी बंदुका, दारूगोळा तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर शस्त्रनिर्मितीचे जाळे उघडकीस आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मारुती श्रीकांत सुतार हा २०२४ पासून स्वतःच्या घरात गावठी बंदुका तयार करून त्यांची विक्री करत होता. गुप्त माहितीच्या आधारे खानापूर पोलिसांनी काटगाळी येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तयार केलेल्या आणि विकलेल्या बंदुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली.

या प्रकरणात बंदुकीचे सुटे भाग पुरवणारे, आर्थिक मदत करणारे तसेच बंदुकीच्या बॅरलचे वेल्डिंग करणाऱ्या कारागिरासह इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान ट्रिगर, बंदुकीचे विविध भाग, शिशाच्या गोळ्या, जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा मोठा साठा जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांकडून या संपूर्ण रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांचा आणि संभाव्य ग्राहकांच्या साखळीचाही तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *