Sunday , July 26 2026
Breaking News

आयपीएल फायनलच्या पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यास बंदी; बेळगाव पोलिसांचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने धडक मारल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना विविध नियम व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, ३१ मे रोजी अंतिम सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुका, विजय रॅली किंवा रस्त्यावर होणाऱ्या जल्लोषाला परवानगी दिली जाणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी सामना प्रक्षेपित करण्यासाठी एलईडी स्क्रीन किंवा व्हिडिओ वॉल उभारण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. आधीपासून उभारलेल्या बाह्य एलईडी स्क्रीनवर सामना प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

फटाके फोडणे, धोकादायक वस्तूंचा वापर करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, दुचाकी किंवा वाहनांच्या रॅली काढणे, बेफाम वेगाने वाहन चालविणे, स्टंट करणे, विनाकारण हॉर्न वाजविणे तसेच रस्त्यावर गर्दी करून गोंधळ घालणे यासारख्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, भांडणे, असभ्य वर्तन किंवा शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही कृत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा, द्वेषपूर्ण संदेश किंवा चिथावणीखोर पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरोधातही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सामन्यानंतर शहरभर मद्यधुंद वाहनचालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, १५ अल्कोमीटरच्या सहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’ तैनात करण्यात येणार असून, कारवाईदरम्यान बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचाही वापर केला जाणार आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. पुनरावृत्ती झाल्यास १५ हजार रुपयांचा दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास तसेच वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी नमूद केले आहे.

शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *