Sunday , July 26 2026
Breaking News

शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरण : डॉली धनंजयसह तीन कलाकारांना सीआयडी चौकशीची शक्यता

Spread the love

 

बेळगाव : शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना, आता कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनाही सीआयडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. तपासाच्या अनुषंगाने काही कलाकारांना नोटीस बजावण्याची तयारी सीआयडीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉली धनंजय, वसिष्ठ सिम्हा तसेच अभिनेत्री रागिणी द्विवेदी आणि सप्तमी गौडा यांच्याकडून माहिती घेण्याची शक्यता आहे.

गत वर्षी २७ डिसेंबर रोजी बेळगावात मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आलेला “कन्नड उत्सव” हा कार्यक्रम सध्या सीआयडी तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

तपास यंत्रणेला अशी शंका आहे की, गुंतवणूकदारांकडून जमा करण्यात आलेल्या ठेवींच्या रकमेतूनच या कार्यक्रमाचा खर्च करण्यात आला असावा. याच अनुषंगाने कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांकडून माहिती घेण्याचा निर्णय सीआयडीने घेतल्याचे सांगितले जात आहे.

शिवम असोसिएट्सविरोधात हजारो कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप असून, विविध जिल्हे आणि राज्यांतील हजारो गुंतवणूकदारांनी या संस्थेत पैसे गुंतविल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. जास्त परतावा आणि आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून ठेवी गोळा करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांचीही चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कलाकारांची चौकशी झाल्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *