Monday , September 21 2026
Breaking News

‘२५ लाख मराठी भाषिकांच्या भावनांशी खेळू नका’; आमदार आसिफ सेठ यांना शुभम शेळके यांचा कडक इशारा

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी “बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असून सीमा प्रश्नाविरोधी ठराव मी स्वतः मांडेन” असे केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विधानामुळे सीमाभागातील सुमारे २५ लाख मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, मराठी जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर राजकारण करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शुभम शेळके बोलताना म्हणाले की, सीमालढा हा केवळ राजकीय विषय नसून शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि सात दशकांच्या संघर्षातून उभा राहिलेला अस्मितेचा लढा आहे. मराठी भाषिकांनी आजवर लोकशाही, शांतता आणि संविधानिक मार्गाने हा संघर्ष सुरू ठेवला आहे. त्यामुळे या विषयावर बोलताना लोकप्रतिनिधींनी इतिहास, भावना आणि वास्तव यांचा विचार करणे आवश्यक आहे.

‘कन्नड संघटनांवरील प्रेम अधिकच उतू जात आहे’

गेल्या काही दिवसांपासून आमदार आसिफ सेठ यांची भूमिका कन्नड संघटनांच्या बाजूने झुकलेली दिसत असल्याची चर्चा मराठी भाषिकांतून सुरू असल्याचे शेळके यांनी नमूद केले. बेळगावातील जनतेने त्यांच्याकडे एक सुसंस्कृत आणि सर्वसमावेशक लोकप्रतिनिधी म्हणून पाहिले आहे. मात्र अशा प्रकारची विधाने त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का देणारी ठरू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

कोविड काळातील सहकार्याची आठवण

कोविड महामारीच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समितीने उभारलेल्या विलगीकरण केंद्राला आमदारांच्या अंजुमन संस्थेने सहकार्य केले होते, याची आठवण करून देत शेळके यांनी परस्पर सहकार्य आणि सलोख्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.

‘इतिहास विसरू नका’

मराठी समाजाच्या भावना आणि हुतात्म्यांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्यांची राजकीय कारकीर्द इतिहासात टिकलेली नाही, असे नमूद करत शेळके यांनी आमदारांना इतिहासाचा धडा लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला. स्वतःचे राजकीय भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तर मराठी जनतेच्या भावनांचा आदर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

लोकशाही मार्गानेच संघर्ष सुरू राहणार

मराठी भाषिक समाज कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या भूमिकेत नसून आपल्या मूलभूत हक्कांसाठी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने संघर्ष करत आहे. हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला, तरीही सीमालढा थांबलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

“लाखो मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास मराठी माणूस गप्प बसणार नाही. त्याचा लोकशाही मार्गाने तीव्र विरोध केला जाईल,” असा स्पष्ट इशारा देत शेळके यांनी सीमाप्रश्नासारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने भूमिका घेण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *