बेळगाव : पावसाळा म्हटला की रस्त्यांवर साचणारे पाणी, कोसळणारी झाडे, ठप्प होणारी वाहतूक आणि नागरिकांचे हाल हे चित्र आता नवे राहिलेले नाही. मात्र यंदा संभाव्य आपत्तींचा धोका ओळखून महापालिकेने पावसाळी संकटांना तोंड देण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळावी आणि आपत्कालीन परिस्थितीवर वेगाने नियंत्रण मिळवता यावे यासाठी तीन विशेष जलद प्रतिसाद (रॅपिड रिस्पॉन्स) पथके तैनात करण्यात आली आहेत.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार पावसाळ्याच्या प्रारंभीच या पथकांची स्थापना करण्यात आली असून दररोज रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे. प्रत्येक पथकात दोन अभियंते, दोन आरोग्य निरीक्षक, स्वच्छता पर्यवेक्षक तसेच आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज असतील.
विशेषतः अतिवृष्टीच्या काळात शहरातील अनेक भागांत पाणी साचणे, ड्रेनेज व्यवस्था विस्कळीत होणे, झाडे उन्मळून पडणे, रस्त्यांवर अडथळे निर्माण होणे आणि वाहतूक विस्कळीत होणे अशा घटनांमध्ये वाढ होत असते. अशा प्रत्येक घटनेवर तात्काळ प्रतिसाद देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
महापालिकेने शहराची उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा तीन विभागांत विभागणी केली असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय २४ तास कार्यरत राहणारी नियंत्रण व मदत कक्ष व्यवस्था उभारण्यात येत असून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
पूरप्रवण क्षेत्रे, महत्त्वाचे चौक आणि पाणी साचण्याची शक्यता असलेले भाग यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत झाडे हटविणे, रस्ते मोकळे करणे आणि स्वच्छता व्यवस्थापनासाठी उद्यान विभागालाही या मोहिमेत सहभागी करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेने पूर्वतयारीला प्राधान्य देत आपत्ती व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणा उभी केली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना त्वरित मदत मिळून संभाव्य नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta