Sunday , June 14 2026
Breaking News

अनैतिक संबंध आणि २ कोटींच्या पॉलिसीसाठी माजी सैनिकाचा खून?

Spread the love

 

सलाईनमधून विष देऊन हत्या केल्याचा संशय; पत्नी व प्रियकरावर संशयाची सुई

बेळगाव : अनैतिक संबंध आणि दोन कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीच्या रकमेच्या हव्यासातून एका माजी सैनिकाचा सलाईनमधून विष देऊन खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील संदीप मंजरगी (वय ४६) यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप मंजरगी हे यमकनमर्डी यात्रेसाठी गेले असताना १३ मार्च रोजी घटप्रभा परिसरात त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना घटप्रभा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देण्याच्या तयारीत होते. मात्र उपचार सुरू असतानाच १५ मार्च रोजी त्यांचा अचानक मृत्यू झाला.

प्राथमिक स्तरावर अपघातामुळे मृत्यू झाल्याचे मानून शवविच्छेदनानंतर घोडगेरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तथापि, या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्याने यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान संदीप मंजरगी यांना रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून विषारी पदार्थ देण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामागे मयताच्या पत्नीचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली असून, दोन कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीच्या रकमेसाठी पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करण्यासाठी गुरुवारी संदीप मंजरगी यांचा दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, तपासाच्या पुढील टप्प्यात अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

स्वीटी नर्सरीतर्फे अक्षराभ्यास संस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न

Spread the love  बेळगाव : कौटुंबिक वातावरणानंतर मुलांचे पहिले पाऊल ज्या ठिकाणी पडते, ते म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *