बेळगाव : हिंदू कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बळाचा आढावा आणि समाजातील गुणवंत मुलींच्या यशाचा सन्मान अशा दुहेरी उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला गणेशपूर-हिंडलगा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे 29 व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक, तर मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
इम्पोरिया टॉवर येथे झालेल्या या कार्यक्रमात जानेवारी महिन्यात श्री मळेकरणी देवस्थान परिसरात पार पडलेल्या भव्य हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत यशस्वी ठरलेल्या मेळाव्याच्या आयोजनातील विविध पैलूंवर चर्चा करत पुढील वाटचालीची दिशा निश्चित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा भारतीय जनता पक्ष बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते. यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, शंकर पाटील, माजी बुडा अध्यक्ष संजय बेळगांवकर, प्रदीप पाटील, तिम्माजी मोरे, भुजंग सादगुडे, सिद्धाप्पा हुक्केरी, भरमा गोमानाचे, अनिल पाटील, पंकज घाडी, शडाक्षरी हिरेमठ, सूर्याजी बिर्जे, उमेश पुरी, बाळू भडगावी, अनिल केसरकर यांच्यासह बेळगाव ग्रामीणमधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
सभेत मल्लाप्पा बेळगांवकर, मारुती पाटील आणि पंकज घाडी यांनी मनोगत व्यक्त केले. तर नारायण पाटील यांनी हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याचा सविस्तर अहवाल सादर करून आयोजनातील विविध बाबींचा आढावा मांडला.
यावेळी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव. दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या प्राजक्ता चौगुले, राधिका बंगारी, स्नेहा हीरोजी, साईशा देसाई, तृप्ती देसाई आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दिव्या देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांची रोख पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना विद्यार्थिनींनी आपल्या यशामागील संघर्ष, मेहनत आणि प्रेरणेचा प्रवास उलगडला. त्यांच्या मनोगताने उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी मुलींना योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास त्या प्रत्येक क्षेत्रात यशाची नवी शिखरे गाठू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. तसेच समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक व्यापक मार्गदर्शनाची गरज असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
समारोपात धनंजय जाधव यांनी हिंदुत्ववादी कार्य, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकतेचे महत्त्व विशद करत, “कार्यकर्त्यांचा विश्वास आणि प्रेम हीच आमची खरी ताकद आहे,” असे सांगितले. त्यांच्या या भावनिक वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
हिंदू संघटनात्मक शक्तीचा आढावा आणि शिक्षण क्षेत्रातील गुणवंत मुलींचा गौरव अशा दुहेरी संदेशामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
Belgaum Varta Belgaum Varta