Tuesday , June 16 2026
Breaking News

उद्यमबागमध्ये खळबळ! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल ५९ जिवंत काडतुसे सापडली

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील उद्यमबाग औद्योगिक परिसरात सोमवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. रस्त्यालगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तब्बल ५९ जिवंत काडतुसे आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी नेहमीप्रमाणे उद्यमबाग परिसरात कचरा संकलन आणि वर्गीकरणाचे काम करत होते. यावेळी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद वस्तू दिसून आल्याने त्यांनी तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे असल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश होसपेटी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसर ताब्यात घेऊन काडतुसे जप्त केली. प्राथमिक तपासात ४१ काडतुसे एका प्रकारची तर १८ काडतुसे दुसऱ्या प्रकारची असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पीएसआय प्रवीण बिरादार यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. ही काडतुसे नेमकी कुठून आली, ती येथे कोणी टाकली आणि त्यामागे कोणता गुन्हेगारी हेतू होता का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे उद्यमबागसह परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, औद्योगिक भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तपासानंतरच या प्रकरणामागील सत्य समोर येणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत संशयास्पद वस्तू अथवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत

Spread the love  बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *