बेळगाव : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक १४ जून २०२६ रोजी, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ (सोनार गल्ली, दत्त गल्ली, पटवर्धन लेआऊट, मा. वडगाव, बेळगाव) आणि जय गणेश युवक मंडळ (सोनार गल्ली, मा. वडगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने १० व्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दत्त गल्ली येथील श्री दत्त मंदिर येथे पार पडलेले हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले.
’रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ हा संदेश समाजात पोहचवण्याच्या उद्देशाने आयोजित या १० व्या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी नेहमीप्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण शिबिरात एकूण ८८ रक्तदात्यांनी आपले रक्त देऊन या सामाजिक उपक्रमात मोलाचे योगदान दिले.
या रक्तदान शिबिरासाठी महावीर ब्लड बँकचे डॉ. यतिंद्र यलबुर्गी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने उपस्थित राहून रक्त संकलनाचे काम अत्यंत चोख पार पाडले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि जय गणेश युवक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मंडळाच्या रक्तदान शिबिराचे हे १० वे वर्ष अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. मंडळाच्या वतीने सर्व रक्तदाते, वैद्यकीय पथक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta