Tuesday , June 16 2026
Breaking News

उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : जमिनीच्या उताऱ्यासंदर्भातील अडचणी, वाढते शुल्क आणि कथित अनियमिततेच्या निषेधार्थ राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. उतारा मिळविताना शेतकऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी जमिनींच्या एकत्रित नोंदी असल्यामुळे स्वतंत्र उतारा मिळविण्यासाठी ३० ते ४० कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. याशिवाय विविध प्रक्रियांच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी उतारे स्वतंत्र करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात महसूल विभागाकडून प्रति एकर ठराविक रक्कम आकारली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. प्रशासकीय त्रुटींचा फटका शेतकऱ्यांना बसत असून याबाबत तातडीने सुधारणा करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे गेल्या अनेक दशकांपासून संबंधित जागांवर वास्तव्यास असतानाही मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदीपत्राची अट घातली जात असल्याने नागरिक अडचणीत सापडत आहेत. मूळ जमीनमालकांचे निधन झाल्यानंतर वारसदारांकडून विविध मागण्या केल्या जात असल्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

राज्य किसान संघाचे अध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांसाठी ‘निबंध स्पर्धा २०२६’ चे आयोजन

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), विश्व भारत सेवा समिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *