बेळगाव : कै. नारायणराव चुडामणी मोदगेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कै. नारायण चुडामणी मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे रणझुंझार शिक्षण संस्था संचलित रणझुंझार हायस्कूल, विद्यामंदिर व कॉन्व्हेंट स्कूल, निलजी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब मोदगेकर उपस्थित होते. तसेच अमर मोदगेकर, तुषार मोदगेकर (नातू), रेणुका मोदगेकर (नात) आणि सिद्राय वर्पे यांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सविता आक्षीमनी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक लक्ष्मण गोमाणाचे तसेच मारुती गाडेकर यांच्या हस्ते कै. नारायणराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी निखिल मोदगेकर यांनी कै. नारायणराव मोदगेकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या शिक्षणप्रेमी वृत्ती, सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिक कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
आपल्या मनोगतात लक्ष्मण गोमाणाचे यांनी निलजी गावाला ट्रक बॉडी बिल्डिंग आणि पेंटिंग क्षेत्रात मिळालेली ओळख ही कै. नारायणराव मोदगेकर यांच्या दूरदृष्टी, परिश्रम आणि मार्गदर्शनामुळेच प्राप्त झाली असून, त्याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच जाते, असे गौरवोद्गार काढले.
यानंतर रणझुंझार शिक्षण संस्थेतील गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सुप्रिया कदम यांनी केले, तर उज्ज्वला डोणकरी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक वाय. पी. पावले, सोमनाथ कुरंगी, सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमातून कै. नारायणराव मोदगेकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिष्ठान भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta