Tuesday , August 18 2026
Breaking News

हमी योजना सुरूच राहणार; अफवांवर विश्वास ठेवू नका : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार

Spread the love

 

बेंगळुरू : राज्य सरकारच्या सर्व हमी योजना शंभर टक्के सुरू राहणार असून कोणत्याही लाभार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे.

राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या हमी योजनांना स्थगिती देण्यात आल्याच्या चर्चा तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवांना मुख्यमंत्री शिवकुमार यांनी रविवारी पूर्णविराम दिला. या दोन्ही योजना बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून त्या पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गृहलक्ष्मी आणि गृहज्योती या काँग्रेस सरकारच्या प्रमुख हमी योजनांपैकी आहेत. या योजनांमुळे राज्यातील लाखो कुटुंबांना थेट आर्थिक व सामाजिक आधार मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या योजना बंद केल्या जाणार नाहीत.

योजनांबाबत विरोधी पक्षांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असून नागरिकांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. लाभार्थ्यांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि सोशल मीडियावरील अप्रमाणित संदेशांकडे दुर्लक्ष करावे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही मृत व्यक्तींच्या नावाने तसेच चुकीची माहिती देऊन योजनांचा लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आल्याने लाभार्थ्यांकडून पुन्हा अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, याचा अर्थ योजना बंद होणार असा अजिबात नसल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे आणि पात्रतेची पडताळणी करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश असून, ही केवळ एक प्रशासकीय कार्यवाही आहे. योजनांच्या अंमलबजावणीवर किंवा लाभ वितरणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून न जाता आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटकातील २३ मंत्र्यांना खातेवाटप; डी. के. शिवकुमारांकडे महत्त्वाची खाती

Spread the love बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील २३ मंत्र्यांना खातेवाटप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *