Tuesday , June 16 2026
Breaking News

हेल्मेट वापरा, जीव वाचवा! बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाला प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : दुचाकीस्वारांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालणे या उद्देशाने बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे हेल्मेट जनजागृती सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर विभागाचे आयजीपी संदीप पाटील आणि पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ झाला.

यावेळी बोलताना आयजीपी संदीप पाटील यांनी उत्तर विभागात दरवर्षी सुमारे दोन हजार नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती दिली. या अपघातांपैकी अनेक अपघात हेल्मेटचा वापर केल्यास टाळता आले असते, असे नमूद करत त्यांनी प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

“रस्ते सुरक्षा ही केवळ पोलीस विभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर ही सवय नव्हे तर गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी वाहनचालकांना हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगितले. “हेल्मेट परिधान करा, जीव वाचवा”, “सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेट आवश्यक” अशा संदेशांचे फलक हातात घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. अनेक दुचाकीस्वारांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत हेल्मेट वापरण्याचा संकल्प व्यक्त केला.

पोलीस आयुक्तालयाकडून आठवडाभर शहरातील प्रमुख चौक, शैक्षणिक संस्था, व्यापारी केंद्रे आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान हेल्मेट वापरण्याचे फायदे, अपघातातील धोके, वाहतूक नियमांचे महत्त्व याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यासोबतच विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जाणार आहेत. मात्र हा उपक्रम केवळ एका आठवड्यापुरता मर्यादित नसून नागरिकांमध्ये कायमस्वरूपी रस्ते सुरक्षा संस्कार रुजविण्यासाठी हेल्मेट जनजागृतीची मोहीम निरंतर सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले.

वाहतूक नियमांचे पालन आणि हेल्मेटचा नियमित वापर केल्यास अनेक कुटुंबांचे आधारस्तंभ वाचू शकतात. त्यामुळे या जनजागृती अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत

Spread the love  बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *