Tuesday , June 16 2026
Breaking News

कन्नड सक्तीविरोधातील मोर्चासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेशी निगडित असलेल्या कन्नड सक्तीच्या प्रश्नाविरोधात जनमत जागृत करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने २२ जून रोजी बेळगाव शहरात व्यापक जनजागृती मोहीम राबविली. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि वस्तीभागांमध्ये पत्रकांचे वाटप करून नागरिकांना आंदोलनाची भूमिका, उद्दिष्टे आणि आगामी लढ्याची दिशा याबाबत माहिती देण्यात आली.

या जनजागृती अभियानाची सुरुवात चव्हाट गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून करण्यात आली. यानंतर समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, जालगार गल्ली, खडक गल्ली, समादेवी गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेनसे गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, हंस टॉकीज रोड, बापट गल्ली, कडोलकर गल्ली, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड आणि हुतात्मा चौक आदी भागांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. तसेच २२ जून रोजी होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ देण्याचे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवराज पाटील, विकास कलघटगी, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, ॲड. अमर येळ्ळूरकर, पिराजी मुचंडीकर, उमेश पाटील, विनोद आंबेवाडीकर, सुनील बाळेकुंद्री, प्रवीण जाधव, सागर पाटील, सतीश देसाई, राजू बिरजे, सुनील बोकडे, रत्नप्रसाद पवार, सुरज कुडूचकर यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. जनजागृती मोहिमेदरम्यान नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आगामी आंदोलनाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

दोन कोटींच्या विमा रकमेसाठी निवृत्त सैनिकाची हत्या; पत्नीसह ९ जण अटकेत

Spread the love  बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा दाव्याच्या लोभापोटी निवृत्त सैनिकाची कट रचून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *