Friday , June 19 2026
Breaking News

सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ अमित शहा यांना निवेदन देणार

Spread the love

 

आसाम-मेघालय धर्तीवर तोडग्याची मागणी

बेळगाव/कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी न्यायालयाबाहेर मार्ग काढून आसाम-मेघालय सीमावादाप्रमाणे तोडगा काढावा आणि मराठी भाषिकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण व्हावे, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ शनिवारी (दि. 20) कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कोल्हापुरात उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मराठा मंदिर सभागृहात झालेल्या बैठकीत या भेटीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 व 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असून, 20 जून रोजी त्यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर समितीकडून निवेदन सादर करण्यात येणार आहे.

समितीने यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख तसेच लोकप्रतिनिधींनाही निवेदन देऊन भेटीसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीत सांगण्यात आले की, 2022 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची संयुक्त बैठक झाली होती. त्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे, दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन करणे तसेच केंद्राकडून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयांची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत समितीने व्यक्त केली.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारांना आवश्यक सूचना देऊन सीमाप्रश्नी सकारात्मक पावले उचलावीत, तसेच मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा : लीना भोमाज

Spread the love  बेळगाव : “स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *