Tuesday , August 18 2026
Breaking News

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली? ६ खासदार बैठकीला गैरहजर

Spread the love

 

मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या चर्चांना उधाण आले आहे. दिल्ली येथे बोलावण्यात आलेल्या महत्त्वाच्या संसदीय बैठकीला पक्षाचे ९ पैकी तब्बल ६ लोकसभा खासदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी सर्व खासदारांना व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र, या बैठकीला केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत उपस्थित होते.

तर ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर हे सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे त्यांच्याशी संपर्कही होत नसल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

कारवाईची शक्यता

व्हिप जारी करूनही बैठकीला गैरहजर राहिल्याने संबंधित खासदारांवर पक्षशिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. तसेच पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत (दहावे अनुसूची) त्यांच्या खासदारकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.

‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवून ठाकरे गटातील खासदारांना आपल्या गोटात खेचल्याची चर्चा रंगली आहे. जर हे सहा खासदार एकत्रितपणे वेगळी भूमिका घेत असतील, तर लोकसभेतील ठाकरे गटाच्या दोन-तृतीयांश संख्याबळाचा आकडा पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातील काही तरतुदींचा त्यांना फायदा मिळू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ठाकरे गटाचा सवाल

दरम्यान, संबंधित खासदारांनी खरोखरच शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यासंदर्भातील पत्रे किंवा सह्यांचे पुरावे अद्याप समोर का आले नाहीत, असा सवाल ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

अमरावतीत आंबोली पब्लिक स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सची सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय थल सैनिक शिबिरासाठी निवड

Spread the love  रायफल शूटिंगमध्ये सार्जंट श्रीपाद तार्लेकर यांना सुवर्णपदक; CQMS राज बागवे यांचीही राष्ट्रीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *