Wednesday , August 19 2026
Breaking News

कन्नड फलक सक्तीविरोधातील मोर्चासाठी जनजागृतीला वेग; मराठी अस्मितेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा : प्रकाश मरगाळे

Spread the love

 

बेळगाव : मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येक मराठी भाषकाने पुढे येणे आवश्यक असून, कन्नड फलक सक्तीविरोधातील लढा हा अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी भव्य मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होऊन लोकशाही मार्गाने आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले.

कन्नड फलक सक्तीविरोधात आयोजित करण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतनगर, वडगाव व जुने बेळगाव परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नाथ पै सर्कल येथून सुरू झालेल्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी बोलताना प्रकाश मरगाळे यांनी, “मराठी भाषकांच्या अस्मितेशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर प्रत्येकाने एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे. कन्नड सक्तीला झुगारून लावण्यासाठी प्रत्येक मराठी बांधवाने या आंदोलनात सहभागी होणे ही काळाची गरज आहे,” असे स्पष्ट केले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध भागांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला. पत्रकांचे वितरण करून मोर्चाची माहिती देण्यात आली तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

भारतनगर, वडगाव आणि जुने बेळगाव परिसरात झालेल्या जनजागृती मोहिमेमुळे आगामी मोर्चाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने मराठी भाषक सहभागी होतील, असा विश्वास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या मोहिमेत ॲड. अमर येळ्ळूरकर, रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, अमोल देसाई, मदन बामणे, सागर पाटील, बाबू कोले, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, शिवराज पाटील, विनोद आंबेवाडीकर, उमेश पाटील, सतीश देसाई, श्रीकांत कदम, किरण हुद्दार, नितीन खन्नूकर, शांताराम होसूरकर, संतोष शिवणगेकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

भाषेच्या भिंती ओलांडून कुगजी दाम्पत्याचा मदतीचा हात; कन्नड साहित्यिकांच्या पत्नीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी 25 हजारांची मदत

Spread the love  येळ्ळूर : जात, धर्म आणि भाषेच्या भिंती बाजूला ठेवून गरजूंच्या मदतीला धावून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *