Wednesday , August 19 2026
Breaking News

स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा : लीना भोमाज

Spread the love

 

बेळगाव : “स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने जिद्दीने वाटचाल करा, असा संदेश हजारो विद्यार्थ्यांना देऊन गेलेल्या प्रभाताई यांचे नाव आज या शाळेला दिले जात आहे हा अतिशय चांगला योग आहे’ असे विचार डॉ.लीना भोमाज यांनी बोलताना व्यक्त केले. महिला विद्या मंडळाच्या एम व्ही एम इंग्लिश मीडियम शाळेचे नामकरण प्रभाताई देशपांडे स्कूल असे करण्याचा समारंभ गुरुवारी सकाळी संपन्न झाला. त्याप्रसंगी शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉक्टर लीना भोमाज या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया हे होते
विद्यार्थिनींच्या स्वागत गीतानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे चेअरमन ऍड. सचिन बिच्चू यांनी प्रास्ताविक करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. प्रभाताई देशपांडे यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील असे ते म्हणाले. “काही माणसे पृथ्वीवर येऊन आपला ठसा उमटवितात आणि अनेकांची आयुष्य बदलून टाकतात त्यामध्ये प्रभाताईंचा समावेश होतो” असे ते म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी ऍड. विवेक कुलकर्णी यांनी बोलताना संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. “शाळेचा 55 वा वाढदिवस आणि प्रभाताईंचा 95 वा वाढदिवस या दोन गोष्टी लक्षात घेऊन आज शाळेचे नाव बदलण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी आपल्या बालपणातील आठवणी सांगितल्या. प्रभाताईंनी घालून दिलेली जीवनमूल्ये, शिस्त, प्रामाणिकपणा या सर्व गोष्टी त्यांनी उलगडून दाखवल्या. शाळेच्या नामकरणाचे अनेक वर्षाचे स्वप्न आज साकार होत आहे” असे ते म्हणाले. कार्यक्रमास पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रभाताईंचे पुतणे रोहित देशपांडे म्हणाले की, प्रभाताई या माझ्या आत्या असल्या तरीही त्यांना आम्ही मावशी म्हणत असु, अतिशय कडक शिस्तीच्या पण मनाने अतिशय मृदू असलेल्या प्रभाताई यांनी आपले जीवन या शाळेसाठी खर्च करून एक वेगळा आदर्श ठेवला आहे. महिला विद्यालय मंडळाचे हजारो विद्यार्थी फक्त बेळगावातच नव्हे तर संपूर्ण देशभर आणि परदेशात विविध ठिकाणी प्रगतीपथावर कार्यरत आहेत.
प्रमुख पाहुण्या लीना भोमाज यांनी 42 वर्षांपूर्वीचे आपले अनुभव सांगून प्रभाताई देशपांडे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. महिला विद्यालयाने फक्त शिक्षण न देता भारतीय संस्कृती, नैतिक मूल्य आणि प्रथा परंपरा यांची सांगड घालून मुलांना घडविले. देशाचे भवितव्य हे भावी पिढीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन प्रभाताईंनी संस्कार केले त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आणि चारित्र्यसंपन्न पिढी घडवली” असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमास सचिव राहुल फडके, ट्रस्टीज अशोक पोतदार, अजित शानभाग, मधुकर परांजपे, संजीव अध्यापक, शोभा शानभाग, विजय आजगावकर, सागर पाटणेकर, प्रिया खटाव, डॉक्टर संजय पोरवाल, वैशाली केळुसकर, विवेक तिनईकर, मुख्याध्यापिका कविता परमाणिक यांच्यासह अनेक मान्यवर,माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच नव्या फलकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त घेतलेल्या शाळेच्या नवीन बसचे आणि संस्थेच्या नूतन अध्यायावत कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

तंजावर साहित्य संमेलनासाठी नियोजन बैठकीचे आवाहन

Spread the love  अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव व शिवसंदेश भारत बेळगाव : तामिळनाडूतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *