बेळगाव : “पाणी जपून वापरा…” हा सल्ला आता केवळ प्रशासनाचे आवाहन राहिलेला नाही, तर येणाऱ्या भीषण पाणीसंकटाचा इशारा ठरत आहे. शहराला जीवनदायी ठरणाऱ्या राकसकोप-हिडकल जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने बेळगावकरांना आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
मान्सूनने अद्यापही अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत असलेल्या जलाशयाची पाणीपातळी धोक्याच्या दिशेने घसरत आहे. त्यामुळे उपलब्ध साठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, अपव्यय टाळावा आणि पाणी बचतीची सवय अंगीकारावी, असे आवाहन महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात मोठी कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या २४ तास पाणी मिळणाऱ्या भागांमध्ये दररोज केवळ दोन ते तीन तास पाणीपुरवठा होणार आहे. तर चार-पाच दिवसांतून एकदा तीन-चार तास पाणी मिळणाऱ्या भागांमध्ये हा कालावधी फक्त एक ते दीड तासांपर्यंत मर्यादित राहणार आहे.
शहरातील ७४५ कूपनलिका आणि ६८ विहिरींना जोडलेली यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली असून गरज भासल्यास त्याद्वारे पाण्याचा उपसा करून पुरवठा केला जाणार आहे. मात्र हा उपाय तात्पुरता असून नागरिकांनी पाणी वाचविल्याशिवाय संकटाची तीव्रता कमी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.
विशेष म्हणजे, शहरातील अनेक भागांत सध्या पाच-सहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी दहा-दहा दिवस नळ कोरडे राहिल्याने नागरिकांना आगामी संकटाची चाहूल लागली आहे. घरगुती वापरासाठी पाण्याची जुळवाजुळव करताना नागरिकांची अक्षरशः दमछाक होत आहे.
एल अँड टी कंपनीने यापूर्वीच पाणी बचतीचा इशारा दिला होता. आता महापालिकेनेही अधिकृतपणे धोक्याची घंटा वाजविली आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रत्येक बेळगावकराने पाण्याचा अपव्यय थांबविणे, साठवणूक करताना काळजी घेणे आणि पाणी बचतीची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक बनले आहे.
आज पाणी जपले, तर उद्याची तहान भागेल; अन्यथा बेळगावसमोर अभूतपूर्व पाणीसंकट उभे राहण्याची भीती नाकारता येणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta