Wednesday , August 19 2026
Breaking News

नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर 28 केंद्रांभोवती जमावबंदी; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (NEET) परीक्षा रविवार, 21 जून रोजी शहर व उपनगरातील 28 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा आयोजित करण्यात येत असलेली ही परीक्षा रविवारी दुपारी 2 ते 5.15 या वेळेत पार पडणार आहे. परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी लागू राहणार असून या कालावधीत कोणालाही गटागटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच परीक्षा केंद्रांच्या परिसरात ध्वनिक्षेपकांचा वापर, घोषणाबाजी, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, व्याख्याने देणे किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी सायबर कॅफे, झेरॉक्स दुकाने तसेच ऑनलाइन सेवा केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रांमध्ये केवळ महाविद्यालयांचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी, परीक्षा व मूल्यमापन कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पालक व सर्वसामान्य नागरिकांना केंद्रांच्या परिसरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय परीक्षा केंद्रांच्या परिसरात काठ्या, शस्त्रे, बंदुका, दगड, स्फोटके अथवा इतर आक्षेपार्ह साहित्य बाळगण्यासही प्रतिबंध घालण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त बोरसे यांनी दिला आहे.

परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

हिडकल जलाशयाची सुरक्षा रामभरोसे!

Spread the love  २० हून अधिक कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; मुख्य प्रवेशद्वाराची दुरवस्था, प्रवेश नियंत्रणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *