Monday , August 17 2026
Breaking News

हायकोर्टाच्या खोट्या सुनावणीचा धाक; 83 वर्षीय वृद्धेला 15 लाखांचा गंडा

Spread the love

 

बेळगाव : दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणीच्या नावाखाली 83 वर्षीय वृद्धेला तब्बल दहा दिवस व्हिडिओ कॉलवर नजरकैदेत ठेवून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना बेळगावात उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या आणि अत्यंत धोकादायक फसवणूक पद्धतीचा पर्दाफाश झाला आहे.

भाग्यनगर येथील रहिवासी विजया उप्पीन (वय 83) यांनी शहर सायबर गुन्हे शाखेत याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन करून स्वतःची ओळख दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि तपास अधिकारी अशी करून दिली. त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याचा बनाव रचत चौकशीस सहकार्य करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

फसवणूक करणाऱ्यांनी वृद्धेला सतत भीतीच्या छायेखाली ठेवत जवळपास दहा दिवस व्हिडिओ कॉलवर संपर्कात ठेवले. या काळात त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच बँक खाती, मुदतठेवी (एफडी), बचत खाते आणि घरातील सोन्याच्या दागिन्यांची सविस्तर माहिती मिळवण्यात आली.

यानंतर कथित चौकशीच्या नावाखाली बँकेतील सर्व एफडी तातडीने मोडण्याचा सल्ला देण्यात आला. अधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेल्या या दबावामुळे विजया उप्पीन यांनी त्यांच्या खात्यातील मुदतठेवी मोडून 9 एप्रिल रोजी एकूण 15 लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यावर वर्ग केले.

रक्कम हस्तांतरित झाल्यानंतर काही दिवस संपर्कात राहिलेल्या भामट्यांनी अचानक संपर्क तोडला. यामुळे संशय आल्याने कुटुंबीयांनी चौकशी केली असता आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे उघड झाले.

या प्रकरणी शहर सायबर गुन्हे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना

सायबर तज्ज्ञांच्या मते, न्यायालय, पोलीस, सीबीआय, ईडी किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे पैसे मागत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता त्वरित कॉल बंद करून जवळच्या सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व विश्वभारत सेवा समितीचे दुसरे बालकवी संमेलन 18 ऑगस्टला

Spread the love  बेळगांव : तारांगण व विश्वभारत सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दुसरे बालकवी संमेलन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *