हुक्केरी : 2 कोटींच्या जीवनविमा रकमेच्या लालसेपोटी माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या कथित हत्येच्या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुमा मंजरगी हिची आई महादेवी बदामी (वय ५७) यांनी मानसिक धक्क्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे घडली.
मुलीला अटक झाल्यानंतर महादेवी या तीव्र मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती समोर आली आहे. मुलीच्या कथित कृत्यामुळे समाजात अपमानास सामोरे जावे लागत असल्याची भावना त्यांना सतावत होती. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, माजी सैनिक संदीप मंजरगी यांना मार्च महिन्यात झालेल्या दुचाकी अपघातात किरकोळ दुखापत झाली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच काळात पत्नी सुमा मंजरगी आणि तिच्या कथित प्रियकराने सलाईनमध्ये विष मिसळून तसेच झोपेच्या गोळ्या देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
या मृत्यूला नैसर्गिक स्वरूप देण्यासाठी शवविच्छेदन अहवालात फेरफार करण्याच्या उद्देशाने न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याला तीन लाख रुपयांहून अधिक लाच देण्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, मुलीच्या कथित कृत्याच्या धक्क्यातून आईने आत्महत्या केल्याने समाजात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, सर्व आरोपांची अधिकृत चौकशी सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta