Thursday , June 25 2026
Breaking News

हेल्मेट क्रांतीला बेळगावकरांचा प्रतिसाद; तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार झाले सुरक्षित!

Spread the love

 

बेळगाव : रस्ते अपघातांमधील मृत्यू आणि गंभीर दुखापतींचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या हेल्मेट जनजागृती अभियानाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. अभियानानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरातील तब्बल 91.80 टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत असल्याचे आढळून आले असून, बेळगावकरांनी सुरक्षिततेचा संदेश स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली जागरूकता आणि हेल्मेटबाबत वाढलेली सकारात्मक मानसिकता यामुळे शहरातील रस्ते अधिक सुरक्षित बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडल्याचे मानले जात आहे. हेल्मेट सक्ती आणि जनजागृती मोहिमेचा थेट परिणाम नागरिकांच्या वर्तनात दिसून येत असून, नियमभंग करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशकभराच्या तुलनेत आज शहरातील दहापैकी नऊ दुचाकीस्वार हेल्मेट परिधान करून वाहन चालवत आहेत. अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या जीवघेण्या दुखापतींपासून संरक्षण देणारे हेल्मेट हेच सर्वात प्रभावी सुरक्षा कवच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

अभियानाच्या यशाचा आढावा घेण्यासाठी रामदेव सर्कल आणि ग्लोबल सर्कल या प्रमुख चौकांमध्ये एक तास प्रत्यक्ष निरीक्षण करून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण 2,820 दुचाकीस्वारांची नोंद घेण्यात आली. त्यापैकी 2,589 वाहनचालक हेल्मेट परिधान करून वाहन चालवत होते, तर केवळ 231 जण विनाहेल्मेट आढळून आले.

रामदेव सर्कल येथे 1,242 पैकी 1,134 जणांनी हेल्मेटचा वापर केल्याने हेल्मेट वापराचे प्रमाण 91.30 टक्के, तर ग्लोबल सर्कल येथे 1,578 पैकी 1,455 जण हेल्मेटधारी असल्याने हे प्रमाण 92.20 टक्क्यांवर पोहोचले आहे. या आकडेवारीने शहरात हेल्मेट संस्कृती रुजत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू होताच शहरातील हेल्मेट विक्रीतही मोठी वाढ झाली. अनेक नागरिकांनी तातडीने हेल्मेट खरेदी करून सुरक्षिततेला प्राधान्य दिले. त्यामुळे जनजागृती मोहिमेचा उद्देश केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे.

एक हेल्मेट… एक जीव वाचवू शकते!

हेल्मेट वापराचे प्रमाण वाढले असले तरी निष्काळजीपणाचे परिणाम किती भीषण असू शकतात याची जाणीव नुकत्याच घडलेल्या एका दुर्घटनेने करून दिली आहे. नाथ पै सर्कल येथे झालेल्या अपघातात टँकरखाली सापडून एका विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हेल्मेटचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

पोलीस विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हेल्मेट हा दंड टाळण्याचा पर्याय नसून जीवन वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवासात, कितीही कमी अंतर असले तरी हेल्मेटचा वापर करावा. कारण अपघात सांगून येत नाही, मात्र हेल्मेट अनेकदा मृत्यूला रोखू शकते.

“नियमांसाठी नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठी हेल्मेट घाला” हा संदेश आता प्रत्येक दुचाकीस्वारापर्यंत पोहोचणे हीच काळाची गरज आहे.

About Belgaum Varta

Check Also

“मराठी असेल तिथे व्यापार करा” आवाहनानंतर शुभम शेळके यांच्याविरोधात गुन्हा

Spread the love  बेळगाव : “मराठी असेल तिथे व्यापार करा” असे आवाहन केल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *