

बेंगळुरू : राज्य सरकारच्या गॅरंटी योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत आता अन्नभाग्य योजनेवरही सरकारची करडी नजर पडली आहे. गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजनांमध्ये सुधारणा केल्यानंतर सरकारने अन्नभाग्य योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 13 ते 14 लाख अपात्र बीपीएल कार्डधारकांना यादीतून हटविण्याची तयारी सुरू झाली आहे.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. अन्नभाग्य योजनेचा मूळ उद्देश गरीब आणि गरजू कुटुंबांपर्यंत अन्नधान्य पोहोचवणे हा असून, त्या उद्देशाला बाधा आणणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या 13 ते 14 लाख लोक अपात्र असूनही बीपीएल कार्डचा लाभ घेत आहेत. अशा लाभार्थ्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच त्यांच्यावर कारवाई करून त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने गरजू कुटुंबांना अधिक प्रभावीपणे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सरकारने अपात्र लाभार्थ्यांना इशाराही दिला असून, ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही बीपीएल कार्ड आहेत त्यांनी स्वेच्छेने आपले कार्ड एपीएलमध्ये रूपांतरित करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा पडताळणीनंतर अशा लाभार्थ्यांवर थेट कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारकडे अपात्र लाभार्थ्यांबाबतची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली असून, यासंदर्भातील अंतिम निर्णय आणि अंमलबजावणीची रूपरेषा येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नभाग्य योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो कुटुंबांचे लक्ष आता सरकारच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta