

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर टोलनाका परिसरात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात कार खोल दरीत कोसळल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलीकवाड येथील चार जण कारमधून घटप्रभाच्या दिशेने प्रवास करत होते. कब्बूर टोलनाक्याजवळ पोहोचताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात कोसळून अनेक वेळा पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला.
या दुर्घटनेत राजेंद्र शंकर पाटील (५०) आणि शीला श्रीपती घाटे (६५, रा. मलीकवाड) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोहन घाटे आणि प्रदीप घाटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिक्कोडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चिक्कोडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य हाती घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्परता दाखविली.

Belgaum Varta Belgaum Varta