Sunday , August 16 2026
Breaking News

विना भीती आव्हानांना सामोरे जा; दिव्यांगांनी आत्मविश्वासाने जीवन घडवावे : आमदार आसिफ सेठ

Spread the love

 

बेळगाव : दिव्यांग व्यक्तींमध्ये विशेष शक्ती असते. त्यामुळे कोणत्याही कारणाने घाबरून न जाता आत्मविश्वासाने आव्हानांना सामोरे जात स्वतःचे जीवन घडवावे, असे आवाहन आमदार आसिफ सेठ यांनी केले.

बेळगाव महानगरपालिकेच्या आवारात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या दारिद्र्य निर्मूलन कक्षामार्फत ५ टक्के अनुदान योजनेअंतर्गत २६ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक मोपेड तीनचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी शासन व महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या असून त्यांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महापौर प्रीती कामकार यांनी दिव्यांगांमध्ये धैर्य व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महापालिकेने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत इलेक्ट्रिक मोपेड तीनचाकी वाहने उपलब्ध करून दिली जात असून त्यामुळे लाभार्थ्यांना स्वावलंबी जीवन जगणे अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले.

उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी पात्र लाभार्थ्यांना भविष्यातही विविध योजनांद्वारे महापालिकेचे सहकार्य मिळत राहील, असे आश्वासन दिले.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी महापालिकेच्या ५ टक्के अनुदान योजनेअंतर्गत २६ दिव्यांग लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक मोपेड तीनचाकी वाहने देण्यात येत असल्याचे सांगून महापालिकेच्या या उपक्रमाचा लाभार्थ्यांनी सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन केले.

यावेळी आमदार, महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते जन्म व मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या अर्ज स्वीकृती व सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमास सत्ताधारी पक्षनेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड, माधवी राघोचे, ब्रह्मानंद मिराजकर, समिती सदस्य, नगरसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन विभागाचे उपआयुक्त उदयकुमार टी. यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले. कंदाय विभागाचे उपआयुक्त डॉ. सिद्दू हुल्लोळी, महापालिका सचिव लक्ष्मी निपाणीकर, पर्यावरण विभागाचे अभियंता हनमंत कलादगी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love  मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *