
बेळगाव : बेळगाव शहर, उपनगरांसह आसपासच्या ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. रस्त्यावर अचानक धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात सातत्याने घडत असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, निवासी वसाहती, बाजारपेठा, बसस्थानके तसेच ग्रामीण भागातील मुख्य मार्गांवर मोकाट कुत्र्यांचे कळप अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. दिवस असो वा रात्र, हे कळप रस्त्यावर मुक्तपणे फिरत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेषतः रात्री आणि पहाटे वाहनांसमोर अचानक कुत्री आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असून गंभीर अपघात घडत आहेत.
याच समस्येचे भीषण वास्तव नुकतेच हिंडलगा मार्गावर समोर आले. मोकाट कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामीण भागात उघड्यावर टाकला जाणारा कचरा, मांसविक्री केंद्रांजवळील अस्वच्छता आणि अपुरी कचरा व्यवस्थापन व्यवस्था यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दूध घालण्यासाठी जाणारे शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक यांना कुत्र्यांच्या कळपांचा रोज सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप वाहनांचा पाठलाग करतात, तर पादचाऱ्यांवर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, मोकाट कुत्र्यांना पकडणे, निर्बिजीकरण करणे आणि रेबीजविरोधी लसीकरण करणे या मोहिमा अत्यंत संथ गतीने किंवा अपुऱ्या प्रमाणात राबवल्या जात आहेत. परिणामी समस्या दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. अधूनमधून होणाऱ्या कारवायांपेक्षा सातत्यपूर्ण आणि व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.
नागरिकांचा जीव धोक्यात असताना प्रशासन आणखी किती अपघात आणि किती जीवितहानीची वाट पाहणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा केवळ प्राण्यांच्या व्यवस्थापनाचा विषय राहिलेला नाही; तो सार्वजनिक सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांच्या जीविताशी थेट संबंधित झाला आहे. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम हाती घेत मोकाट कुत्र्यांचे पकडणे, निर्बिजीकरण, लसीकरण आणि कचरा व्यवस्थापनावर तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. आणखी एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतर नव्हे, तर आताच ठोस कृती होणे ही काळाची गरज आहे.

Belgaum Varta Belgaum Varta