Friday , July 3 2026
Breaking News

गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची घराघरांत पडताळणी; अपात्रांवर लागणार लगाम

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अचूक करण्यासाठी राज्यभरात विशेष पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र नागरिकांनाच मिळावा आणि अपात्र लाभार्थ्यांची नोंद रोखली जावी, या उद्देशाने सर्व वीज वितरण कंपन्यांना लाभार्थ्यांची अतिरिक्त माहिती संकलित करून तिची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे लवकरच वीज कंपनीचे कर्मचारी घराघरांत जाऊन लाभार्थ्यांच्या माहितीची खातरजमा करणार आहेत.

राज्य सरकारने १ जुलै २०२३ पासून गृहज्योती योजना लागू केली असून, पात्र घरगुती वीज ग्राहकांना दरमहा कमाल २०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून दिली जाते. २०२२-२३ या वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे प्रत्येक ग्राहकासाठी पात्र युनिट निश्चित करण्यात आले असून, त्यावर अतिरिक्त १० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच ४८ युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या ग्राहकांना किमान १० युनिटचा अतिरिक्त लाभ दिला जात आहे.

मात्र, योजना सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी चुकीची अथवा अपूर्ण माहिती, तसेच अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्याने शासनाने आता पडताळणीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक लाभार्थ्याची माहिती प्रत्यक्ष तपासून शासनाच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार आहेत.

पडताळणीदरम्यान पुढील माहितीची खातरजमा केली जाणार आहे:

– वीज वितरण कंपनीचे नाव
– वीज खाते (कनेक्शन) क्रमांक
– खातेदाराचे नाव
– वीज जोडणीचा संपूर्ण पत्ता
– मालक अथवा भाडेकरू असल्याची माहिती
– आधार क्रमांक
– आधारवरील नाव
– संपर्कासाठी मोबाईल क्रमांक

पडताळणीसाठी येणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शासनाने केले आहे. या मोहिमेमुळे गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांच्या नोंदी अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनतील. परिणामी, शासनाच्या मोफत वीज योजनेचा लाभ केवळ पात्र कुटुंबांपर्यंतच पोहोचण्यास मदत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक ८ जुलैला; सीमावासीयांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या लढ्याला दिशा देणारी आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *