
बेळगाव : शहरात सध्या महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे. अनगोळ, काँग्रेस रोडसह अनेक भागांत रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत असताना, शहरातील सर्वाधिक वर्दळीची व्यापारी पेठ असलेल्या वडगाव बाजारपेठेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कारवाई सर्वांसाठी की निवडक भागांसाठी?” असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वडगाव बाजारपेठ ही हजारो नागरिकांची दैनंदिन वर्दळ असलेली व्यापारी पेठ आहे. मात्र रस्त्यांच्या दुतर्फा उभारलेले अनधिकृत स्टॉल, फेरीवाल्यांचा वाढता कब्जा, दुकानांनी रस्त्यावर वाढवलेला माल, तसेच बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा रोज सामना करावा लागत आहे. सकाळ-सायंकाळ बाजारपेठेत निर्माण होणारी कोंडी ही आता नित्याची बाब बनली आहे.
महानगरपालिकेची अधूनमधून होणारी कारवाई ही कायमस्वरूपी उपाय ठरत नसल्याचे वास्तव आहे. काही तास कारवाई होते आणि पुन्हा अतिक्रमणे पूर्ववत होतात. त्यामुळे ही मोहीम केवळ औपचारिकता ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. अतिक्रमण हटविण्याबरोबरच ते पुन्हा होणार नाही, यासाठीही प्रभावी यंत्रणा उभी करणे तितकेच आवश्यक आहे.
अर्थात, अतिक्रमणाचा प्रश्न केवळ फेरीवाल्यांपुरता मर्यादित नाही. काही व्यापाऱ्यांकडूनही दुकाने रस्त्यावर वाढवली जातात, सार्वजनिक जागांचा वापर केला जातो आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करताना कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान निकष लागू करणे हीच प्रशासनाची खरी कसोटी आहे.
महानगरपालिकेने शहर सुशोभीकरण आणि वाहतूक सुरळीत करण्याचा निर्धार केला असेल, तर त्यात वडगाव बाजारपेठेचा समावेश अपरिहार्य आहे. एखाद्या भागात कठोर कारवाई आणि दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष, अशी भूमिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
वडगावमधील अतिक्रमणांचा प्रश्न आता केवळ वाहतुकीचा राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या सुरक्षिततेचा, शिस्तीचा आणि प्रशासनाच्या समान न्यायाच्या तत्त्वाचा विषय बनला आहे. त्यामुळे कोणताही दुजाभाव न करता वडगाव बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही तातडीने आणि सातत्यपूर्ण कारवाई करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा अतिक्रमण हटाव मोहिमेवर ‘निवडक कारवाई’ असा शिक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Belgaum Varta Belgaum Varta