Sunday , July 26 2026
Breaking News

पाण्याचे पाणी, चारा, आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या : मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निर्देश

Spread the love

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक

बेळगाव : जिल्ह्यात पावसाची कमतरता जाणवत असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भासू नये यासाठी सर्व आवश्यक पूर्वतयारी तातडीने करावी. गरज भासल्यास राखीव निधीचा वापर करून खासगी बोअरवेल आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी पार पडलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

पावसाळी हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही शाळा इमारत जीर्ण अवस्थेत असल्यास किंवा वर्गखोल्यांमध्ये गळती होत असल्यास अशा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवू नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी शिक्षण विभागाला दिले.

जिल्ह्यातील जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी पुरेसा साठा ठेवावा. नैसर्गिक आपत्ती किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास बाधितांना सरकारी मदत तातडीने वितरित करावी, असेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेऊन जनजागृती करावी. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा तुटवडा भासू नये याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

दरम्यान, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सादर केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत २६ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. यामुळे ७ तालुक्यांतील ३२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून १५ गावांना टँकरद्वारे तर २३ गावांना खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

बेळगाव महानगरपालिका क्षेत्रात हिडकल व राकसकोप्प जलाशयांमधून पाणीपुरवठा सुरू असून गरज पडल्यास ३५ टँकर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सर्व टँकरना जीपीएस प्रणाली बसवून सतत देखरेख ठेवण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.

कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ६.०१ लाख हेक्टर क्षेत्रात म्हणजेच सुमारे ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून खतांचा कोणताही तुटवडा नाही. १.२१ लाख मेट्रिक टनांहून अधिक खतसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तर फलोत्पादन क्षेत्रात ७४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे.

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांची सुरक्षा तपासणी पूर्ण केली असून धोकादायक वर्गखोल्या बंद करून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

आरोग्य विभागाने मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी तयारी केल्याचे सांगत, खाणापूर तालुक्यात संपर्क तुटण्याची शक्यता असलेल्या १५ गावांसाठी रुग्णवाहिका तैनात करण्यात येत असल्याची माहिती दिली.

या बैठकीस विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महापालिका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *